बुलढाणा : वरुड (धाड) पैनगंगा साखर कारखाना प्रा. लि. ने विदर्भातील सर्वाधिक उच्चांकी ३१२१ रुपये प्रतिटन ऊसदर अदा करून शेतकरी हिताची परंपरा कायम राखल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारखान्याने निश्चित एफआरपीपेक्षा तब्बल ७३६ रुपये अधिक ऊसदर अदा करून शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल गुंजाळ यांनी दिली. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत ५८ कोटींची ऊस बिले जमा केली आहेत असे त्यांनी सांगितले.
चेअरमन गुंजाळ यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे. टन पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या हंगामात या क्षमतेची यशस्वी चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली आहे. पुढील गाळप हंगामासाठी कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊस नोंद झालेली असून सुमारे ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत असून परिसरातील ऊस लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या हंगामात गाळप केलेल्या सर्व ऊसाची बिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी गाळप हंगाम यशस्वीतेसाठी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पाठवावा असे त्यांनी आवाहन केले.


















