कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत ५५ रुपये आणि इथेनॉलची आधारभूत किंमत ७५ रुपये करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यात प्रेसमड आणि स्पेंटवॉशपासून सीबीजी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दिली.शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५७ वी आणि श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी गणपतराव पाटील बोलत होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सभेसमोर विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. तसेच सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना संजीव देसाई यांनी समर्पक उत्तरे दिली. कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाचा आढावा सादर केला. हा हंगाम ११२ दिवस चालला. या कालावधीत कारखान्याने ११ लाख ७८ हजार ७०४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. १२.३५ टक्के साखर उताऱ्याने १२ लाख ८५ हजार ९७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
कारखान्याने गळितासाठी उपलब्ध झालेल्या उसाला सुरुवातीला प्रतिटन ३ हजार ४५० रुपये एकरकमी ऊसदर अदा केला. त्यानंतर आणखी ५० रुपये प्रतिटन देण्यात आले. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ५०० रुपये प्रतिटन ऊसदर मिळाला. हा दर केंद्र शासनाच्या एफआरपीपेक्षा प्रतिटन १२२ रुपये अधिक असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने, नगराध्यक्षा योगिता कांबळे, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील तसेच कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते.


















