नवी दिल्ली : देशातील मोबाईल फोन उत्पादनाला आणखी गती देण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग योजना (MPMS) मंजूर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीस मंजुरी दिली आहे. या योजनेच्या कालावधीत देशात सुमारे 39 लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन उत्पादन करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. ते म्हणाले की, या नव्या योजनेचा उद्देश भारतातील मोबाईल उत्पादनाचा विस्तार करणे, देशांतर्गत मूल्यवर्धन (व्हॅल्यू ॲडिशन) वाढवणे, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अधिक सक्षम करणे आणि जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता मजबूत करणे हा आहे.
ही योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीत म्हणजेच पाच वर्षे लागू राहणार आहे. या कालावधीत मोबाईल उत्पादनासोबतच मोबाईल निर्यातीतही मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत भारतात मोबाईल फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पात्र विक्रीवर (Eligible Sales) 2.25 टक्के ते 5 टक्के इतके प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) दिले जाईल. तसेच, महत्त्वाच्या सुट्या भागांचा (कॉम्पोनंट्स) आणि उप-असेंब्लींचा देशांतर्गत वापर वाढवण्यासाठी 1.5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
भारतीय कंपन्यांना स्वतःची उत्पादने विकसित करण्यासाठी उत्पादन डिझाइन तसेच संशोधन आणि विकास (R&D) यावर आधारित पात्र विक्रीसाठी 3 टक्के अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे भारतीय ब्रँड, तांत्रिक स्वावलंबन आणि भारतीय पेटंटला चालना मिळेल. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2014 च्या तुलनेत भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सातपट वाढ झाली आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स निर्यात अकरापट वाढली आहे. ते म्हणाले की, एकेकाळी मोबाईल फोन आयात करणारा भारत आता मोबाईल फोनचा निव्वळ निर्यातदार बनला असून, उत्पादनाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे.
सरकारच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे सुमारे 60 हजार थेट रोजगार निर्माण होतील. त्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि भारताचे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत होईल.सरकारने सांगितले की, सध्या भारतात वापरले जाणारे 99.2 टक्के मोबाईल फोन देशातच तयार केले जातात. तसेच 2025 मध्ये स्मार्टफोन हा भारताचा सर्वाधिक निर्यात होणारा उत्पादन प्रकार ठरला असून, त्याने डिझेल इंधन आणि हिरे यांसारख्या पारंपरिक निर्यात उत्पादनांनाही मागे टाकले आहे.
सरकारच्या मते, प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI-LSEM) योजनेमुळे भारत मोबाईल उत्पादन आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्यास मोठी मदत झाली. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2026 रोजी संपला असून, नव्याने मंजूर करण्यात आलेली मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग योजना (MPMS) ही त्या यशाला पुढे नेण्यासाठी राबवली जाणार आहे.


















