नवी दिल्ली : केंद्र सरकार सहकार क्षेत्रात स्वतंत्र जीवन विमा कंपनी स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली. या उपक्रमामुळे सहकारी संस्थांचा वित्तीय सेवा क्षेत्रातील विस्तार होणार असून देशातील सहकार चळवळीला नवे बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.सहकार मंत्रालयाच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले की, नवीन जीवन विमा कंपनीमुळे सहकार क्षेत्राचा विस्तार दुग्ध, साखर आणि खत उद्योगापुरता मर्यादित न राहता विमा आणि वित्तीय सेवांपर्यंत होईल.
ते म्हणाले की, इफको (IFFCO) ही सहकारी संस्था जपानी भागीदारासोबत संयुक्त उपक्रमाद्वारे विमा व्यवसायात आधीपासून कार्यरत आहे. आता नवीन सहकारी जीवन विमा कंपनीमुळे या क्षेत्रातील सहकाराची भूमिका अधिक मजबूत होईल. अमित शहा यांनी भारत टॅक्सी उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. पुढील दोन वर्षांत हा उपक्रम देशातील 500 शहरांमध्ये विस्तारला जाणार असून सहकारी संस्था नव्या व्यावसायिक क्षेत्रातही यशस्वीपणे प्रवेश करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशात सध्या सुमारे 8.5 लाख सहकारी संस्था असून त्यांच्याशी 30 कोटींहून अधिक सदस्य जोडलेले आहेत. त्यामुळे भारतात जगातील सर्वात मोठ्या सहकारी व्यवस्थांपैकी एक निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर सहकार चळवळीला नवी दिशा मिळाल्याचे सांगताना शहा म्हणाले की, या क्षेत्रात पारदर्शकता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच देशातील सर्व सहकारी संस्थांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात आला असून भविष्यातील विस्तारासाठी तो महत्त्वाचा ठरेल.
राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासाठी नव्हे, तर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत कोणत्याही राज्य सरकारने मंत्रालयाच्या हस्तक्षेपाबाबत तक्रार केलेली नाही.सहकार क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने गुजरातमधील आनंद येथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच 2047 पर्यंत विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीत सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात 50 हजार प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांचे डिजिटल रूपांतर करून त्यांना ई-पॅक्स (e-PACS) बनविण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे ग्रामीण सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण होणार आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या सहकारी पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये 75 हजार टन क्षमतेच्या 135 धान्य गोदामांचे हस्तांतरण, 85 नवीन गोदामांचे उद्घाटन, 47 नवीन धान्य साठवण प्रकल्पांचे भूमिपूजन, अमूल आणि एनसीसीएफच्या ‘सहकार वन’ प्रकल्पांचा शुभारंभ तसेच उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि महाराष्ट्रातील जळगाव येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (BBSSL)च्या टिश्यू कल्चर केंद्रांचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (BBSSL) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्यात देशातील बियाणे व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. तसेच दुग्ध सहकारी संस्थांसाठी आदर्श उपनियम आणि सहकार मंत्रालयाच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवरील प्रकाशनाचेही प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सरकारच्या उपक्रमांचे स्वागत केले.
केंद्र सरकारने “सहकारातून समृद्धीकडे” या संकल्पनेअंतर्गत कृषी, दुग्ध व्यवसाय, महिला बचत गट, शहरी सेवा आणि ग्रामीण संस्थांमध्ये सहकार क्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडविण्यात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


















