कोल्हापूर : सध्या देशात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून साखरेच्या मागणीतही वाढ होत आहे. एप्रिल-मे हा साखर वापराचा पीक सीझन मानला जातो. याच काळात कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम आणि फूड प्रोसेसिंग उद्योगांची मागणी शिगेला पोहोचते. त्यामुळे या काळात कारखान्यांना साखर विक्रीची मोठी संधी आहे. ज्या राज्यांना कोटा वाढवून दिला आहे त्यांना उन्हाळ्याच्या परिस्थितीचा चांगला फायदा मिळू शकतो, असे तज्ज्ञांच्या म्हणणे आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने एप्रिलच्या तुलनेत एकूण साखर कोटा २३.० लाख टनांवरून २२.५ लाख टनांवर आला असला, तरी काही राज्यांना वाढ मिळाली आहे तर काहींच्या वाट्याला लक्षणीय कपात करण्यात आल्याचे दैनिक ‘सकाळ’च्या वृत्तात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश या राज्याने सर्वाधिक ८.७२ लाख टन कोटा मिळवत एप्रिलच्या तुलनेत सुमारे ११.४३ टक्के वाढ नोंदवली आहे. तर महाराष्ट्राचा कोटा ८.१६ लाख टनांवरून ६.६६ लाख टनांवर आला आहे, म्हणजेच कोट्यात सुमारे १८.४३ टक्क्यांची घट झाली आहे. कर्नाटकातही १९.२२ टक्के घट नोंदली गेली आहे. कोटा कपातीमुळे साखर कारखान्यांना तयार साखर बाजारात विक्रीस मर्यादा येणार आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणात साखर साठा गोदामात अडकण्याची शक्यता असून, कारखान्यांचा रोख प्रवाह विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी देयकांवर होऊ शकतो. सद्यस्थितीत बिहार (८.१५ टक्के), पंजाब (१६.३० टक्के) आणि तमिळनाडू (२७.४२ टक्के) या राज्यांतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे म्हणजे राजस्थानमध्ये केवळ २९१ वरून १७४३ टनांपर्यंत कोटा वाढत तब्बल ४९८.९७ टक्क्यांची झेप घेतली आहे.


















