छत्रपती संभाजीनगर : एफआरपीची थकीत १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांची रक्कम न भरल्याप्रकरणी संत एकनाथ- सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली. कंपनीच्या जप्त मालमत्तेचा तब्बल ८ कोटी ९ लाख रुपयांना जाहीर लिलाव करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना करार पद्धतीने चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाची थकीत एफआरपी रक्कम १९ कोटी ४९ लाख २७ हजार रुपये देण्यात आली नव्हती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कंपनीची साखर, टायर व विना टायर बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच मोलॅसिस जप्त करण्यात आले होते.
ही जप्त मालमत्ता पैठण तहसील कार्यालयात शुक्रवारी तहसीलदार ज्योती पवार आणि नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्या उपस्थितीत लिलावासाठी ठेवण्यात आली. या लिलाव प्रक्रियेत आठ लिलावधारकांनी सहभाग घेतला. यामध्ये यश कन्स्ट्रक्शन सप्लायर्स, अहिल्यानगर यांनी सर्वाधिक बोली लावत मालमत्ता खरेदी केली. साखर ५३७.८२ लाख रुपये, टायर बैलगाड्या १८१.२४ लाख रुपये आणि विना टायर बैलगाड्या ९०.७२ लाख रुपये अशा स्वरूपात एकूण ८ कोटी ९ लाख रुपयांना हा लिलाव पूर्ण झाला. यावेळी विशेष लेखा परीक्षक दीपक मोरे, कंपनीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार उपस्थित होते.


















