वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावाचा परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकेने इराणवर नव्याने हल्ले केल्यानंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमतीत 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) माहितीनुसार, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर इराणने हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेने इराणची ही कृती युद्धविरामाचे उल्लंघन आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांची अंतरिम शांतता करारातून माघार…
नाटो शिखर परिषदेदरम्यान तुर्कीची राजधानी अंकारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अंतरिम शांतता करार रद्द करण्याची घोषणा केली. तसेच, यापुढे इराणच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तणाव वाढल्यानंतर अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाचा भाव 74.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला, जो 5.8 टक्क्यांनी वाढला. तर जागतिक मानक ब्रेंट क्रूडची किंमत 78.35 डॉलर प्रति बॅरलवर गेली असून त्यात 5.65 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
चर्चेमुळे यापूर्वी तेलाचे दर झाले होते स्थिर…
जून महिन्यात अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर (MoU) दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला होता. त्यानंतर युद्धविराम लागू करण्यात आला आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी 60 दिवसांसाठी व्यापारी जहाजांसाठी शुल्कमुक्त खुली करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही पूर्वपदावर आल्या होत्या. मात्र, ताज्या घडामोडींमुळे बाजारात पुन्हा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाई वाढण्याची शक्यता…
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण तणाव आणखी वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. त्याचा परिणाम जागतिक महागाईवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत पेट्रोलचे दर आधीच उच्च पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तसेच आगामी निवडणुकांवरही होऊ शकतो.


















