महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांवर कर्जाचे संकट; मजूर पुरवठ्याच्या नावाखाली मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीचे शेकडो गुन्हे दाखल

महाराष्ट्र: महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांना मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमांकडून मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 2022 ते 2025 या कालावधीत मजूर उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या आगाऊ रकमेत कथित फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदारांचे सुमारे 257 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या कालावधीत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत मजूर मुकादमांकडून कथित फसवणुकीचे 1,953 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी 3,162 मुकादमांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कोल्हापुरात सर्वाधिक गुन्हे दाखल

ChiniMandi WhatsApp Channel

या पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1,154 गुन्हे नोंदवण्यात आली आहेत. ही संख्या एकूण प्रकरणांच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. त्यानंतर सांगली 235 गुन्हे, सोलापूर 216 गुन्हे , पुणे 175 गुन्हे आणि सातारा जिल्ह्यात 173 गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक ऊस उत्पादक शेतकरी गाळप हंगामात ऊस वाहतूक करून अतिरिक्त उत्पन्न मिळवतात. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर, ट्रक किंवा इतर वाहने आहेत, असे शेतकरी हे काम करतात. मात्र ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आर्थिक जोखीम सुरू होते. वाहतूकदारांकडून मजूर आणण्याची जबाबदारी असलेल्या मुकादमांना मोठ्या प्रमाणात आगाऊ रक्कम दिली जाते. हे मुकादम प्रामुख्याने स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या टोळ्या तोडणीसाठी उपलब्ध करून देतात.

यातील अनेक मजूर मुकादम मराठवाडा आणि विदर्भातील असतात. या भागांतून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात येतात. काही मुकादम एकाच मजूर टोळीसाठी अनेकांकडून आगाऊ रक्कम घेतात किंवा पैसे घेतल्यानंतर गायब होतात, असा वाहतूकदारांचा आरोप आहे. मजूर ऊसतोडीसाठी आले नाहीत, तर वाहतूकदारांकडे वाहन कर्जाचे हप्ते, इंधन, दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च सुरूच राहतो; मात्र वाहतूक करण्यासाठी ऊस उपलब्ध होत नाही.अनेक वाहतूकदार मुकादमांना आगाऊ रक्कम देण्यासाठी स्वतःची बचत वापरतात किंवा मालमत्ता गहाण ठेवतात. साखर कारखान्यांच्या माध्यमातून बँक कर्ज घेऊन मुकादमांना रक्कम दिली जाते.

माजी खासदार राजू शेट्टींची सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, 2022 नंतर पोलिसांनी अशा फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात फौजदारी गुन्हे म्हणून नोंदवण्यास सुरुवात केली आहे. मात्र केवळ फौजदारी गुन्हे दाखल केल्याने समस्या सुटलेली नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. आरोपी मुकादम जामीन मिळवून पुन्हा त्याच व्यवसायात येऊ शकतात. दुसरीकडे वाहतूकदारांना आपले पैसे परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांच्यावर आर्थिक दबाव, धमक्या आणि काही वेळा प्रतिगुन्ह्यांचा सामना करण्याची वेळ येते.शेट्टी यांनी या प्रश्नावर सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतल्याचे सांगितले.तसेच, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि पैसे वसुलीसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्ताव दिवंगत अजित पवार उपमुख्यमंत्री असताना चर्चेत आला होता; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

ऊस पुरवठा साखळीतील आर्थिक जोखीम अधोरेखित

या प्रकरणांमुळे महाराष्ट्रातील ऊस पुरवठा साखळीतील आर्थिक जोखीम समोर आली आहे.साखर कारखाने वाहतूकदारांशी करार करतात आणि वाहने व इतर साधनांसाठी बँक कर्ज मिळवून देण्यास मदत करतात. वाहतूकदार त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर मुकादमांना मजूर उपलब्ध करून देण्यासाठी आगाऊ रक्कम देण्यात करतात.या व्यवस्थेत मोठी आर्थिक जोखीम वाहतूकदारांवरच येते, तर ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी आवश्यक मजूर मिळवण्यासाठी त्यांना मुकादमांवर अवलंबून राहावे लागते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here