कोल्हापूर : राज्यातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच साखर कारखानदारांसमोर कमी साखर उताऱ्याचे (रिकव्हरी) आव्हान उभे राहिले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या गाळपात राज्यातील बहुतांश विभागांचा साखर उतारा सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे. साखर आयुक्तालयाच्या २ नोव्हेंबरअखेरच्या गाळप अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
साखरेची संभाव्य टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. राज्यातील एकूण २२४ साखर कारखान्यांपैकी २०८ कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. मात्र, ऊसदर आंदोलनामुळे उर्वरित कारखान्यांचे गाळप सुरू होऊ शकले नव्हते.
हंगामाच्या सुरुवातीलाच गाळप सुरू झाल्याने अनेक ठिकाणी ऊस पूर्णपणे परिपक्व झालेला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात उसाची अपेक्षित वाढ न झाल्याने आणि कोवळ्या उसाचे गाळप झाल्याने साखर उताऱ्यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.
साधारणपणे राज्यात कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो. मात्र, यंदा लवकर गाळप सुरू झाल्याने या विभागाचाही उतारा ९.०५ टक्क्यांवर मर्यादित राहिला आहे. ऊस पीक अभ्यासकांच्या मते, हंगामाच्या सुरुवातीला उसाची उपलब्धता, पिकाची परिपक्वता, हवामानातील बदल आणि ऊसतोडणीची वेळ या घटकांचा साखर उताऱ्यावर परिणाम होत आहे. हंगामाच्या मध्यावर उसाची उपलब्धता आणि गाळपाचे प्रमाण वाढल्यानंतर रिकव्हरीमध्ये सुधारणा होते का, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
विभागनिहाय ऑक्टोबरमधील साखर उतारा (टक्क्यांत) :
- कोल्हापूर : ९.०५
- पुणे : ८.७३
- अहिल्यानगर : ७.९३
- सोलापूर : ७.४३
- अमरावती : ७.३५
- छत्रपती संभाजीनगर : ७.२६
- नांदेड : ७.०७
ऑक्टोबरमध्ये अपरिपक्व उसाचे गाळप झाल्याने साखर उताऱ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. कमी रिकव्हरीचा परिणाम साखर उत्पादनावर होण्याबरोबरच कारखान्यांच्या आर्थिक गणितावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखर उतारा वाढविणे हे कारखानदारांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.


















