कोल्हापूर : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन विनाकपात ४,५०० रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. कर्नाटक सरकार चांगला ऊसदर देऊन गळीत हंगाम सुरू करत असताना महाराष्ट्रातील, विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात पहिली बैठक झाली. मात्र, शेतकरी संघटनांनी आपल्या मागणीवर ठाम भूमिका घेतल्याने बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.
सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले. ऊसदरावर सकारात्मक तोडगा काढून साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, असे आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये करण्याची मागणी
राजू शेट्टी म्हणाले की, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करावी, यासाठी शेतकरी संघटनांनी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. केंद्र सरकारकडून साखरेची नवीन किमान विक्री किंमत निश्चित होणे आणि बाजारातील सध्याचे दर या बाबींचा विचार करून साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा.पुढील वर्षभरात साखरेच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आणि मागील वर्षातील सरासरी विक्री दर यांचाही विचार ऊसदर निश्चित करताना केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
उत्पादन खर्च वाढला; शेतकऱ्यांना भरीव दर देण्याची मागणी
मागील गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच साखर उताऱ्यातील घट आणि वजनातील घट यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून साखर कारखानदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार उसाची पहिली उचल भरीव स्वरूपात जाहीर करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
कर्नाटकातील बैठकीच्या निर्णयाकडे सीमाभागाचे लक्ष
कर्नाटकात सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा सीमाभागातील ऊसदरावर परिणाम होण्याची शक्यता राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
ऊसदराचा प्रश्न आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतीपंपांसाठी प्रशासनाने उपसाबंदी लागू केली आहे. धरणांतून नदीपात्रात पाणी सोडणे बंद केल्यामुळे नदीपात्रे कोरडी पडली आहेत. एकीकडे ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, तर दुसरीकडे शेतीसाठी पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले.आता दोन दिवसांनी होणाऱ्या पुढील बैठकीत ऊसदराचा तिढा सुटतो का आणि कारखाने सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















