कोल्हापुरी गुळाला वाढली गुजरातमधून मागणी, दर पाच हजारांहून अधिक

कोल्हापूर : गुजरातमध्ये श्रावण महिन्यासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांचे लक्ष कोल्हापूर बाजाराकडे केंद्रित झाले आहे. शीतगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुळाचा साठा नसल्याने सणासुदीच्या काळातील मागणी भागविण्यासाठी दररोज नवीन मालाची आवश्यकता भासत आहे. परिणामी कोल्हापूर बाजारात गुळाचे सौदे नियमितपणे होत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे सरासरी एक हजार रुपयापर्यंत गुळाच्या किमती वधारल्या आहेत. महिनाभरापूर्वी गुळाचे दर ४५०० ते ४६०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होते. आता हे दर ५,२०० ते ५,८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सध्या येथील बाजार समितीत बिगर हंगामी गुळाची सात ते आठ हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. कर्नाटकातून गुळाची आवक घटल्याचा फायदाही झाला आहे. बुधवारी कोल्हापुरात गुळास प्रति क्विंटल ६५०० रुपये असा उचांकी दर मिळाला. एका किलोच्या गूळ रव्याने प्रति क्विंटल ७०५० रुपयांपर्यंत बाजी मारली. अन्न व औषध प्रशाासनाच्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काही गुळाची आवक कमी झाली असून, तेथील गुळाचे व्यवहार मर्यादित झाले आहेत. परिणामी कर्नाटकातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा कल कोल्हापूरच्या बाजाराकडे वाढला आहे. आगामी काळातही गुळाच्या बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी व गुऱ्हाळघर चालकांकडून व्यक्त होत आहे. वाढलेल्या दरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघर मालकही सक्रिय झाले आहेत. अनेक गुऱ्हाळघर मालक बाहेरील जिल्ह्यांमध्ये ऊस शोधण्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here