धाराशिव : ऊस गळीत हंगामात जिल्ह्याने यंदा दमदार कामगिरी केली आहे. हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला होता. बहुतांश कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर आणि मार्चमध्ये आपले गाळप यशस्वीरीत्या पूर्ण केले. जिल्ह्यात एकूण ६२ लाख ११ हजार टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ४९ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.९७ इतका नोंदवला गेला आहे. उसाची उपलब्धता आणि कारखान्यांची गाळप क्षमता यामुळे जिल्ह्यातील आर्थिक चक्राला मोठी गती मिळाली आहे. काही ठिकाणी साखर उताऱ्यात घट झाली असली तरी एकूण उत्पादनाचा आकडा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे.
जिल्ह्यात ६ सहकारी आणि ८ खाजगी अशा चौदा कारखान्यांनी गाळप प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामध्ये खासगी कारखान्यांनी ४०.५५ लाख टन उसाचे गाळप करून ३२.४७ लाख क्विंटल साखर उत्पादित केली. तर, सहकारी कारखान्यांनी २१.५६ लाख टन गाळप करून १७.०२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. यात कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याने सर्वाधिक १० लाख १० हजार टन उसाचे गाळप करून जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर मुरूम (उमरगा) येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याने १०.३१ टक्के इतका उच्चांकी साखर उतारा मिळवून गुणवत्तेत बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ कांचेश्वर शुगरने १०.१ टक्के उतारा नोंदवला आहे.


















