धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २९) पार पडली. उपपदार्थ निर्मितीच्या जोरावर कारखान्याने अहवाल वर्षात तब्बल ६४.२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या नफ्यातून सभासदांना त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात सलग चौथ्या वर्षी उच्चांकी २५ टक्के लाभांश देण्याची घोषणा ठोंबरे यांनी यावेळी केली. प्रदूषण कमी करण्यासाठी अमेरिका व युरोपमधील देशांनी विमानांमध्ये ‘शाश्वत इंधन’ वापरणे बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर उसाचा रस, इथेनॉल आणि शेतातील टाकाऊ काडी-कचऱ्यापासून ‘शाश्वत’ विमान इंधन’ तयार करण्याचा प्रकल्प नॅचरल शुगर लवकरच सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, रासायनिक खतांचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि शेतीचा घसरलेला पोत सुधारण्यासाठी कारखान्याने नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर, पोटॅश, अमिनो अॅसिड आणि ह्यूमिक अॅसिड अशा विविध सेंद्रिय खतांची निर्मिती केली आहे. ही खते शेती गट कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिली जात आहेत. साखर निर्मितीत सल्फरऐवजी कार्बन डायऑक्साइडचा वापर करणारा नॅचरल शुगर हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे. आगामी हंगामात पूर्णपणे सल्फरमुक्त साखर तयार केली जाईल. सल्फरचा दर आणि आरोग्यावर होणारा अनिष्ट घेऊन नॅचरल शुगरने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सीओटू हानिकारक ठरत नाही. तो साखरेच्या रसात मिसळत नाही. सल्फरचा थेट सहभाग असतो असेही त्यांनी स्पष्ट केले.


















