धाराशिव : रांजणी (ता. कळंब) येथील देशातील पहिला खासगी साखर कारखाना असलेल्या नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजने सरलेल्या गळित हंगामातील ऊसासाठी प्रतिटन ३,१५० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. हा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, अंतिम दरानुसार प्रतिटन १५० रुपयांची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.
ठोंबरे म्हणाले, नॅचरल उद्योग समूहाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन, अंतर्गत मशागत आणि खरीप पिकांच्या पेरणीसाठी तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने अंतिम हप्ता अदा करण्यात आला आहे.
ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगरने सातत्याने मराठवाड्यात ऊसाला सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सरलेल्या हंगामात कारखान्याने १० लाख ११ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रतिटन ३,००० रुपये पहिला हप्ता १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.


















