धाराशिव : रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर कारखान्याचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांनी ओला कचरा, फूडवेस्ट व शिल्लक अन्नापासून बायोगॅस निर्मिती (एलबीजी) केली आहे. कारखान्याच्या विश्रामगृहात (गेस्ट हाउस) पाच वर्षांपासून याच बायोगॅसचा वापर केला जात आहे. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपासून प्रकल्प सुरू आहे. विश्रामगृहातील ओला कचरा, फूडवेस्ट यापासून तयार झालेल्या गॅसचा वापर दहा ते पंधरा सदस्यांचा स्वयंपाकासाठी नियमितपणे सुरू आहे. कारखान्याची ही बायोगॅस निर्मितीही सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून घेत आहे.
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या गॅस टंचाईत श्री. ठोंबरे यांनी देशाच्या स्वावलंबन व आत्मनिर्भरतेसाठी एलपीजीला बायोगॅसचा शाश्वत पर्याय दिला आहे. नॅचरल शुगर कारखान्याने स्थापनेपासूनच ऊर्जा व पाणी बचतीचे प्रयोग केले आहेत. कारखान्यात सहवीजनिर्मितीसाठी वेचणीनंतर निघालेल्या शेतातील टाकाऊ काडी कचरा, तुराट्यांचा वापर केला जातो. बायोगॅसचा वापर सर्व हॉटेल्स, वसतिगृहे, सार्वजनिक कँटिन व नागरिकांसाठी उपयुक्त असल्याचे ठोंबरे यांचे मत आहे. सध्या अनेक उत्पादक रेडिमेड प्लास्टिकच्या (एचडीपी) बायोगॅस संयंत्राचे उत्पादन करतात. दोन ते शंभर घनमीटर क्षमतेचे बायोगॅस प्लांट रेडिमेड मिळतात. हे प्लांट सुद्धा तातडीने बसवल्यास त्यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकणार आहे. यामुळे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या किमान ५० ते ७५ टक्के गॅसची गरज भागू शकते, असे श्री. ठोंबरे यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात बायोगॅसच्या शाश्वत पर्यायाचा वापर करून आत्मनिर्भर होण्याची गरज ठोंबरे यांनी दैनिक अग्रोवनशी बोलताना व्यक्त केली.


















