बीड : दिवाळीचा सण गोड व्हावा आणि ऊसतोड कामगार कुटुंबांना सणासुदीच्या काळात मदत मिळावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील जवळपास 12 हजार ऊसतोड कामगार कुटुंबांना दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला. केज तालुक्यातील गंगामाउली शुगर येथे हा शिधा वाटप कार्यक्रम पार पडला. शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उपक्रम
राज्यातील कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका शिवसेनेकडून सातत्याने घेतली जाते. याच भावनेतून यंदा ऊसतोड कामगारांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे हजारो कामगार कुटुंबांना सणाच्या काळात मदतीचा हात मिळाला असून त्यांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली आहे.


















