इथेनॉल मिश्रणामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत, वाहनांच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम नाही : ‘आयओसीएल’चे माजी अध्यक्ष बी. अशोक

कोयंबतूर (तामिळनाडू): भारताच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत झाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे आणि कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट झाली आहे. तसेच E20 इंधनामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होते किंवा मायलेजमध्ये मोठी घट होते, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे माजी अध्यक्ष बी. अशोक यांनी सांगितले. ‘एएनआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अशोक म्हणाले की, E20 इंधनाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अनेक शंका या वैज्ञानिक पुराव्यांपेक्षा गैरसमज किंवा अतिशयोक्त दाव्यांवर आधारित आहेत. सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे देशाला आर्थिक आणि पर्यावरणीय अशा दोन्ही स्तरांवर मोठा फायदा झाला आहे.

ते म्हणाले, या कार्यक्रमाची तीन प्रमुख उद्दिष्टे होती आणि तिन्ही बाबतीत देशाला मोठा लाभ झाला आहे. अशोक यांच्या मते, इथेनॉल मिश्रणामुळे भारताने सुमारे 31 दशलक्ष टन कच्च्या तेलाच्या आयातीची बचत केली असून, त्यामुळे सुमारे 1.9 लाख कोटी रुपयांची परकीय चलनाची बचत झाली आहे. ते पुढे म्हणाले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून शेतकरी समुदायाला सुमारे 1.60 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. पर्यावरणीय फायद्यांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमामुळे सुमारे 930 लाख टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य (CO₂ Equivalent) उत्सर्जनात घट झाली असून, भारताच्या हवामान बदलासंदर्भातील उद्दिष्टांना यामुळे बळकटी मिळाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

E20 इंधनावर व्यापक वैज्ञानिक चाचण्या…

E20 इंधनामुळे वाहनांचे नुकसान होते, या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना अशोक म्हणाले की, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलच्या संशोधन केंद्राने अनेक वर्षे संशोधन आणि व्यापक चाचण्या केल्यानंतरच E20 इंधनाचा वापर सुरू करण्याची शिफारस केली होती. ते म्हणाले, संशोधनात वाहनांच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम आढळलेला नाही. उलट काही बाबतीत कार्यक्षमता सुधारण्याची शक्यता दिसून आली आहे. त्यांच्या माहितीनुसार, E20 इंधनाची शिफारस करण्यापूर्वी चारचाकी वाहनांची सुमारे 40,000 किलोमीटर, तर दुचाकींची 20,000 किलोमीटर चाचणी घेण्यात आली होती.

मायलेजबाबतही मोठा परिणाम नाही…

मायलेजबाबतच्या शंकांवर त्यांनी सांगितले की, संशोधनात E20 इंधनामुळे मायलेजवर कोणताही लक्षणीय परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनाची स्थिती, नियमित देखभाल, टायरमधील हवेचा दाब आणि ल्युब्रिकंट्स यांसारख्या अनेक घटकांवर इंधन कार्यक्षमता अवलंबून असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

अफवांनाही दिले उत्तर…

इथेनॉलमुळे मुंग्या, मधमाशा किंवा इतर कीटक आकर्षित होतात, या सोशल मीडियावरील दाव्यांनाही त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, डिस्टिलेशन प्रक्रियेनंतर इथेनॉलमध्ये साखरेचा कोणताही अंश शिल्लक राहत नाही, त्यामुळे अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तसेच E20 मध्ये पेट्रोलच मुख्य घटक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अन्नसुरक्षेवर परिणाम नाही…

अशोक यांनी सांगितले की, अन्नसुरक्षा धोक्यात येईल, ही भीतीही निराधार आहे. शेती प्रामुख्याने अन्न उत्पादनासाठीच केली जाते आणि फक्त अतिरिक्त उत्पादन तसेच तुटलेला तांदूळ (ब्रोकन राईस) यांसारख्या उर्वरित कच्च्या मालाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर केला जातो. वाहनांच्या वॉरंटी किंवा विमा दाव्यांवर E20 इंधनाचा परिणाम होतो, हा दावाही त्यांनी फेटाळला. वाहन उत्पादक कंपन्या, तेल विपणन कंपन्या आणि विमा कंपन्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, E20 इंधनाचा वापर केल्यामुळे वाहनाची वॉरंटी किंवा विमा दाव्यावर कोणताही परिणाम होत नाही. शेवटी ते म्हणाले, “या सर्व वैज्ञानिक निष्कर्षांमुळे ग्राहकांनी कोणतीही शंका न बाळगता E20 इंधनाचा वापर करावा, इतका विश्वास निर्माण होणे पुरेसे आहे.”

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here