कोल्हापूर : देशात १ एप्रिलपूर्वी यापूर्वीचे २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य प्राप्त केले असून, यापुढील काळात ते ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनने केली आहे. सद्यस्थितीत अमेरिका आणि इस्रायलने इराणसोबत सुरू केलेल्या युद्धामुळे जग मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. युद्धस्थितीमुळे निर्माण झालेली जागतिक इंधन आणि गॅसटंचाई पाहता, भारताचा ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ कार्यक्रम देशासाठी गेम चेंजर ठरत आहे. देशात उसाचा रस आणि मळीपासून बनवण्यात येणाऱ्या इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या २,००० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीपैकी ६०० हजार कोटी इथेनॉल निर्मितीची क्षमता महाराष्ट्रात आहे.
वेस्टर्न इंडियन शुगर असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले दैनिक ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, सरकारने मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला उठाव नाही. ब्लेंडिंग वाढवून इथेनॉलचा उठाव वाढवावा. तर इथेनॉलमुळे अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली असून पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवण्यात केंद्र सरकारने यश मिळवले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३०-४० टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, इथेनॉल मुळे भारतात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे टार्गेट पूर्ण झाले असून ३० टक्के मिश्रणाची मागणी आहे. आता भारताने गेल्या वर्षभरात इथेनॉलमधून वाचवलेले १.४५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन आता देशाच्या अर्थव्यवस्थेला तारक ठरत आहे.


















