ब्राझीलमध्ये इथेनॉलला प्राधान्य, जागतिक स्तरावरही साखरेचा दर उच्चांकाच्या दिशेने

कोल्हापूर : जागतिक साखर आगामी काळात साखरेचा पुरवठा आणखी घटण्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे. २०२६-२७ हंगामातील जागतिक साखर तुटवड्याचा अंदाज विश्लेषकांकडून व्यक्त केला जात असून, २०२७-२८ मध्ये ऊस आणि बीटच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्यास हा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे ब्राझीलसारख्या प्रमुख उत्पादक देशांमध्ये ऊस पीक साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचा पुरवठा घटण्याच्या शक्यतेने अमेरिकेतील साखर वायद्यांच्या दरात तेजी कायम आहे. भारतात तर सर्वकालीन उच्चांकी दरापर्यंत साखर पोहोचली आहे. सणासुदीमुळे वाढलेले साखरेचे दर कुठेपर्यंत जातील याचा अंदाज बांधणे शक्य नाही. साखरेची टंचाई होणार, असा संदेश जात असल्याने भारतात एक ते दीड महिन्यात क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांनी अनपेक्षित वाढ झाली.

अमेरिकेत साखर वायदे प्रति पौंड १७ सेंटच्या वर पोहोचले असून, मे २०२५ नंतरचा हा सर्वोच्च स्तर ठरला आहे. एल निनोमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रमुख साखर उत्पादक देशांमध्ये हवामानाचा धोका वाढला आहे. भारत, युरोपीय संघ आणि थायलंड हे प्रतिकूल हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील प्रदेश मानले जात आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता साखरेच्या दरातील वाढीला बळ देत आहे. जूनमध्ये ब्राझीलचे साखर उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घटले. अवकाळी मुसळधार पावसाने ऊस तोडणी आणि गाळपाच्या कामात अडथळे निर्माण केले. यामुळे आगामी हंगामातील जागतिक साखर तुटवड्याच्या शक्यतेला आणखी बळ मिळाले. ब्राझीलमध्ये साखर आणि इथेनॉलसाठी होणारा उसाचा वापरही बाजाराच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे साखर उत्पादनासाठी उपलब्ध ऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून भारताबरोबर जगातील साखर बाजारातही मोठ्या प्रमाणात तेजीचा कल आहे. दरम्यान, गुळाच्या दराबाबत हीच स्थिती असून, गुळाचे दरही सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here