ऊस गाळप हंगाम संपला, तरी पंजाबमधील शेतकऱ्यांचे ₹250 कोटी थकीत

चंदीगढ : पंजाबमध्ये ऊसासाठी प्रति क्विंटल 416 रुपये राज्य सल्लागार दर (SAP) निश्चित करण्यात आला आहे, जो देशातील सर्वाधिक दरांपैकी एक मानला जातो. या दराची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार खासगी साखर कारखान्यांना प्रति क्विंटल 68.5 रुपये अनुदान देते. मात्र, हे अनुदान वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना देयके देण्यात विलंब होत आहे. विशेष म्हणजे, साखर कारखाने दोन महिन्यांपूर्वीच बंद झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांना सुमारे 1,000 कोटीं दिले असले तरी अजूनही जवळपास 250 कोटी थकीत आहेत. सहकारी क्षेत्रात 392 कोटींचे वितरण झाले असून, सुमारे 303 कोटींची देणी अद्याप प्रलंबित आहेत.

यंदाच्या हंगामात पंजाबमधील ऊस उत्पादनातही घट झाली आहे. राज्यात सुमारे 500 लाख क्विंटल ऊस उत्पादन झाले, जे मागील वर्षीच्या 632 लाख क्विंटल उत्पादनाच्या तुलनेत जवळपास 20% कमी आहे. उत्पादन घटल्यामुळे कारखाने नेहमीपेक्षा लवकर बंद करावे लागले. पंजाबमध्ये खासगी आणि सहकारी अशा दोन्ही प्रकारचे साखर कारखाने आहेत. सात खासगी कारखान्यांपैकी सहा कारखाने यंदा सुरू होते. यात मुकैरियन, दसुया, कीरी अफगाना, बटर सेवियन आणि अमलोह येथील कारखान्यांचा समावेश होता. धुरी येथील कारखाना सलग तिसऱ्या वर्षी बंद राहिला. सहकारी क्षेत्रात मोरिंडा, बुधेवाल, नवांशहर, नकोदर, फाजिल्का, भोगपूर, गुरदासपूर, बटाला आणि अजनाला येथील नऊ कारखाने कार्यरत होते.

ChiniMandi WhatsApp Channel

पंजाबमध्ये हरियाणा (₹415 प्रति क्विंटल) आणि उत्तर प्रदेश (₹400 प्रति क्विंटल) यांच्या तुलनेत अधिक SAP दिला जात असला, तरी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हा दर वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत पुरेसा नाही. सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी थकीत देयकांची पुष्टी करताना सांगितले की, ती लवकरच अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊस आयुक्त अमरीक सिंह यांनी सांगितले की, खासगी कारखान्यांसाठी 62 कोटींच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली असून, आणखी 172 कोटी मंजुरीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here