कोल्हापूर : ऊस पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पाण्याची गरज बदलत असते. त्यामुळे संपूर्ण हंगामासाठी एकच सिंचन वेळापत्रक ठेवण्याऐवजी पिकाच्या अवस्थेनुसार सिंचन करणे अधिक योग्य ठरते. यासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा स्वीकारण्याची गरज आहे. ऊस शेतीत पाऊस आणि सिंचन यांचा योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. पावसाचा मोठा खंड पडल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकावर पाण्याचा ताण येऊ शकतो. त्यामुळे सिंचनाचा निर्णय घेताना मागील पावसाचे प्रमाण, जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकाची वाढीची अवस्था आणि पुढील हवामानाचा अंदाज या चार बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. शेताचा उतार, सरीची दिशा आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन निचऱ्याची व्यवस्था करावी. अतिवृष्टी झाल्यानंतर अतिरिक्त पाणी शक्य तितक्या लवकर शेताबाहेर काढणे आवश्यक आहे. पाणी कमी पडू नये, तसेच पाणी जास्त काळ साचूही नये, हे ऊस पाणी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्त्व असावे.
याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमधील कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ मोहिनी गायकवाड,सचिन पाटील, डॉ. अशोक कडलग यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, भविष्यात ऊस शेती अधिक अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करणे आवश्यक आहे. मृदा आर्द्रता सेन्सर, स्वयंचलित सिंचन नियंत्रक, हवामान केंद्र आणि मोबाईल आधारित हवामान माहिती यांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन फर्टिगेशन मृदा आर्द्रता सेन्सर हवामान माहिती यांचा एकत्रित वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार सिंचन करता येते. त्यामुळे ‘पाणी उपलब्ध आहे म्हणून सिंचन’ करण्याऐवजी ‘पिकाला जेव्हा आणि जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढेच पाणी देणे’ हा दृष्टिकोन विकसित करणे गरजेचा आहे. ऊस शेतीत सिंचनाइतकेच जलनिचरा व्यवस्थापनालाही महत्त्व द्यावे. गरजेनुसार हलके सिंचन करावे. पीक पक्वतेकडे जात असताना पाण्याचे नियोजन बदलावे, काढणीच्या जवळ अनावश्यक अतिसिंचन टाळावे. जमिनीतील ओलावा, पिकाची स्थिती आणि काढणीचे नियोजन लक्षात घेऊन अंतिम सिंचनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


















