कोल्हापूर : ऊस पिकावर उन्हाचा फटका आणि कमी पाणी याचा मोठा परिणाम होतो. उत्पादन घटते. मात्र, उत्पादन आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. खरे तर पाण्याअभावी उसाची पाने वाळतात. मुळांची कार्यक्षमता घटते. वाढ खुंटते. ऊस कोरडा पडू लागतो. हे टाळण्यासाठी उसाच्या योग्य जातींची निवड गरजेची आहे. फुले १३००७ आणि को ८६०३२ यांसारख्या जाती कमी पाण्यातही चांगली वाढ देत असतात.
शिवाय, उसाला पाचटाचे आच्छादन असणे गरजेचे आहे. सरींमध्ये पाचट टाकल्यास बाष्पीभवन कमी होतो आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन हा एक प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे निम्म्या पाण्याची बचत होते. ऊन्ह किती आहे हे पाहून सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. गांडुळ खत, शेणखतामुळे मातीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पिकाला पाणी चांगले उपलब्ध होते. तण आणि खत व्यवस्थापन हीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. केओलीन व सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी वेळच्या वेळी करायला हवी.


















