कोल्हापूर : उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन छेडले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून छावणी आंदोलन सुरू आहे. उसाच्या पहिल्या उचलीच्या प्रश्नावर प्रशासन आणि साखर कारखानदारांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेत चक्काजामचे हत्यार उपसले.
आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळावा, यासाठी संघटनेने पूर्वतयारी केली होती. परिसरातील गावांमध्ये रॅली काढून शेतकरी आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राजू शेट्टी यांनी किणी येथील ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर उतरून वाहतूक रोखली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने किणी टोल नाका परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीचा खोळंबा कमी करण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने फाटा मार्गे, तर पुण्याकडून येणारी वाहने वाघवाडी फाटा मार्गे वळविण्यात आली आहेत. त्यामुळे किणी टोल नाका परिसरातील महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच
उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे साखर कारखानदार आणि प्रशासनावर दबाव वाढला असून, पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















