नवी दिल्ली: भारतातील खत अनुदानाचा खर्च आर्थिक वर्ष २०२७ मध्ये ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात यासाठी करण्यात आलेल्या १.७ लाख कोटी रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत हा खर्च जवळपास दुप्पट असेल, असा अंदाज आनंद राठी रिसर्चच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.कृषी क्षेत्राला सरकारकडून सातत्याने मिळणारे पाठबळ आणि पोषक तत्त्वांवर आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांमध्ये झालेली वाढ यामुळे खत अनुदानाच्या खर्चात मोठी वाढ अपेक्षित आहे.
नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फर या प्रमुख पोषक घटकांच्या कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या असल्याने अनुदानावरील खर्च वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आनंद राठीच्या क्षेत्रीय आढावा अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७ मध्ये खत अनुदान ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. यासाठी अर्थसंकल्पात १.७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रब्बी २०२७ हंगामासाठी ६२,३७० कोटींचे अनुदान मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी २०२७ हंगामासाठी ६२,३७० कोटी रुपयांच्या पोषक तत्त्वांवर आधारित अनुदानाला अलीकडेच मंजुरी दिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ६४ टक्क्यांनी अधिक आहे.आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीसाठी एनबीएसचे दर वाढवण्यात आले आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फर यांच्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे खत उत्पादक कंपन्यांना उत्पादनाच्या दृष्टीने आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असे अहवालात म्हटले आहे.
किमान आधारभूत किमतींच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना पाठबळ
खत अनुदानाबरोबरच किमान आधारभूत किमतींच्या (एमएसपी) माध्यमातूनही सरकारकडून कृषी क्षेत्राला मिळणारे पाठबळ वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ या कालावधीत प्रमुख पिकांच्या एमएसपीमध्ये सरासरी ६.३ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ नोंदवली जाण्याचा अंदाज आहे.कापूस, तेलबिया, कडधान्ये, मका आणि धान या पिकांच्या एमएसपीमधील वाढीचा यामध्ये मोठा वाटा आहे. एमएसपी आणि खत अनुदानाच्या माध्यमातून सरकारकडून सातत्याने मिळणारे सहकार्य कृषी अर्थव्यवस्थेला आधार देत असल्याचे आनंद राठीने नमूद केले आहे.
आर्थिक वर्ष २०२८ मध्ये कृषी निविष्ठांच्या मागणीत वाढ अपेक्षित
पिकांना मिळणारा लाभदायक दर आणि सरकारकडून वाढणारे आर्थिक पाठबळ यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील पैसा वाढण्यास मदत होऊ शकते. परिणामी खते आणि कृषी रसायनांसारख्या कृषी निविष्ठांच्या मागणीतही वाढ होण्याची शक्यता आहे.सरकारी मदत, पिकांचे अनुकूल दर आणि यंदा सामान्य मान्सून राहण्याची शक्यता या घटकांमुळे कृषी निविष्ठांच्या मागणीत सुधारणा होईल, असा आनंद राठीचा अंदाज आहे. विशेषतः आर्थिक वर्ष २०२८ मध्ये ही सुधारणा अधिक स्पष्टपणे दिसू शकते.या पार्श्वभूमीवर आनंद राठी रिसर्चने कृषी रसायन क्षेत्राबाबतचा आपला दृष्टिकोन ‘सावध’ या श्रेणीतून बदलून ‘सकारात्मक’ केला आहे. आर्थिक वर्ष २०२८ मध्ये या क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.














