गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर यांचे संचालकपद रद्द !

कोल्हापुर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे तालुका गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. प्रकाश शहापूरकर हे संचालक मंडळाच्या १४ सभांना परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे संचालकपद रद्द झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दैनिक ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे कारखान्याची एकहाती सत्ता आली. त्यानंतर डॉ. शहापूरकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. तब्बल २२ वर्षांनंतर त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे आली होती.

२०२४ मध्ये तत्कालीन अध्यक्ष शहापूरकर यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्याची मागणी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह १२ संचालकांनी केली होती; परंतु तत्पूर्वीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रकाश पताडे यांची निवड झाली. त्यानंतर अपवाद वगळता संचालक मंडळाच्या सभांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे कारखान्याच्या उपविधीप्रमाणे त्यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. त्याबाबत कारखान्याच्या प्रशासनाकडून प्रादेशिक साखर सहसंचालकांना माहिती देण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील सुमारे ३० कोटींच्या घोटाळाप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल आहे. परंतु, अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे अटकेची कारवाई टळली होती. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील गैरव्यवहाराची चौकशीही सुरू आहे.

न्यायालयात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल होण्यापूर्वी आणि सहसंचालकांच्या चौकशीचा अहवाल बाहेर येण्यापूर्वीच संचालक मंडळाच्या सभांना गैरहजर राहिल्याच्या कारणावरून त्यांचे संचालकपद रद्द झाले आहे.याबाबत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे म्हणाले की, डॉ. शहापूरकर हे संचालक मंडळाच्या १४ सभांना परवानगीशिवाय गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या उपविधीनुसार त्यांचे संचालकपद रद्द झाले असून, त्याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांना अवगत करण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here