कोल्हापूर : केडीसीसी बँक राज्यात सर्वोत्कृष्ट असून, या बँकेवर लाखो शेतकरी, ग्राहक, ठेवीदार अवलंबून आहेत. रिझर्व्ह बँकेने काही तांत्रिक चूक काढली आणि दंड केला आहे. तो भरण्याची तयारी अन्नपुर्णा शुगर अँड जॅगरीचे प्रमुख माजी आमदार संजय घाटगे यांनी दाखवली आहे. घाटगे यांची काहीही चूक नसताना बँकेला आकारलेला दंड त्यांनी स्वतः भरण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. माजी आमदार संजय घाटगे यांनी अन्नपुर्णा साखर कारखान्याच्या कर्जामुळे बँकेला कोणताही फटका बसू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात अध्यक्ष मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, अन्नपूर्णा शुगर अँड जागरी प्रकल्पाला १८ जून २०१२ रोजी कर्ज दिले. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२४ ला संजय घाटगे यांची तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती झाली. नाबार्डच्या आक्षेपानंतर घाटगे यांनी मार्च २०२६ ला ‘अन्नपूर्णा’च्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. ही वस्तुस्थिती केडीसीसी बँकेच्यावतीने रिझर्व्ह बँकेला कळविलेली असतानासुद्धा दंड केला. हा दंड माफ होण्याविषयी पुन्हा एक अपील करणार आहोत आणि त्यानंतर मग निर्णय घेऊ. वस्तुस्थिती सांगूनही दंडांची आकारणी आरबीआयने केल्याचे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, हेर्ले (ता. हातकणंगले) येथील हृदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला मागणीनुसारच रितसर कर्ज दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


















