छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना मदत देताना केवळ खरीप पिकांचे नुकसानच नव्हे, तर रब्बी हंगामातील नुकसानीचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दुष्काळग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे केवळ कायद्यातील तरतुदींमुळे केले जात आहेत. पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून ठेवण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. मदत सरसकट केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूरमध्ये परिस्थिती गंभीर
लातूर जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यापूर्वीच्या दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात सुमारे ६३ टक्के पाऊस झाला होता. यंदा ही स्थिती आणखी गंभीर असून पावसाचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करेल, असे फडणवीस यांनी सांगितले. “काळजी करू नका आणि धीर सोडू नका. पुढील तीन-चार महिने आपल्याला एकमेकांना सांभाळावे लागणार आहेत. या कठीण काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
थकीत पाणीपुरवठा योजनांची देयके सरकार भरणार
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ज्या पाणीपुरवठा योजनांची देयके थकीत आहेत, ती राज्य सरकारकडून भरण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१९७२ पेक्षाही परिस्थिती गंभीर
खरोसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांनी तालुक्यातील विविध अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. यावेळी गावातील शेतकरी वाळलेले सोयाबीन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी सध्याची परिस्थिती १९७२च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचे मान्य करत फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय जारी करण्याचे आश्वासन दिले.
धाराशिवमध्येही शेतकऱ्यांशी संवाद
लातूर जिल्ह्यातील दोन गावांच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा आणि येरमाळा येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील उपाययोजनांना गती देण्यासाठी जिल्हा पातळीवर ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला जात आहे. या माध्यमातून पाणी, चारा, पीक नुकसान आणि इतर तातडीच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून समन्वयाने कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.


















