कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात शॉर्टसर्किटने सव्वाशे एकरातील ऊस जळून खाक

कोल्हापूर: निळपण (ता. भुदरगड) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सुमारे सव्वाशे एकरांतील ऊस पिक जळाले. मंगळवारी (दि. १०) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास म्हसोबाचा माळ परिसरात शॉर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात असलेली आग वाऱ्याच्या वेगामुळे काही वेळातच भडकली. दुपारी अडीचच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले., संपूर्ण परिसरातील ऊसशेतीला मोठा फटका बसला आहे. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली; परंतु तोपर्यंत सुमारे सव्वाशे एकरांतील ऊस जळून खाक झाला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटने लागलेली ही आग झपाट्याने पसरली. आगीची भीषणता लक्षात घेऊन बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा वेग आणि वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आग विझविण्यात मोठ्या अडचणी आल्या. त्यातच आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुरेसा पाणंद रस्ता नसल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी जाणेही कठीण झाले. आग निळपण गावाच्या हद्दीतून थेट दारवाड गावच्या सीमेपर्यंत पोहोचली. मोठ्या क्षेत्रातील हिरवीगार ऊसशेती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ऐन दिवाळीच्या सणातच शेतकऱ्यांच्या वर्षभराचे कष्ट वाया गेल्याने निळपण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here