महागड्या एलपीजी सिलिंडरला सरकारने शोधला पर्याय, सरकारी कंपन्या आणणार खास इथेनॉलचा स्टोव्ह

मुंबई : भारताला आपल्या गरजेच्या तब्बल ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी परदेशातून आयात करावा लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे या किमती कमी-जास्त होत असतात. त्यामुळे देशातील आघाडीच्या सरकारी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरला एक भक्कम आणि परवडणारा पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणारे खास स्टोव्ह आणि त्यासाठीचे इंधन बाजारात आणणार आहेत. केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणाला बळ देण्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या दिग्गज कंपन्यांनी या विशेष प्रकल्पावर वेगाने काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत केवळ गाड्यांच्या इंधनात म्हणजेच पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे ‘इथेनॉल’ थेट स्वयंपाकघरात पोहोचेल.

भारतात इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. हे इंधन प्रामुख्याने उसाचा रस, मका आणि खराब झालेल्या धान्यापासून तयार केले जाते. भारतात याचे उत्पादन वेगाने वाढत असल्याने, आयात कराव्या लागणाऱ्या एलपीजीच्या तुलनेत इथेनॉल ग्राहकांना खूपच स्वस्त पडणार आहे. पारंपारिक चुली, लाकूड किंवा कोळशाच्या तुलनेत इथेनॉलवर चालणारे स्टोव्ह अत्यंत स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आहेत. यातून धूर निघत नसल्याने प्रदूषण कमी होते. त्यामुळे महिलांचे आरोग्यही जपले जाते. एलपीजी गॅस वापरताना नेहमीच गॅस गळती किंवा सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती मनात असते. मात्र, इथेनॉलच्या वापरामध्ये अशी कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नसते, त्यामुळे इथेनॉल हे इंधन स्वयंपाकासाठी अधिक सुरक्षित मानले जात आहे. आफ्रिकेतील केनिया, इथिओपिया, घाना, टांझानिया आणि मोझांबिक यांसारख्या देशांमधील हॉस्पिटल्स, हॉस्टेल्स आणि मोठ्या कम्युनिटी किचनमध्ये इथेनॉलचा वापर सर्रास केला जातो. थायलंड, फिलीपिन्स आणि लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलसारख्या देशांनीही स्वयंपाकाचे मुख्य इंधन म्हणून इथेनॉल वापरण्यास सुरुवात केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here