सोनीपत : राज्यात पावसामुळे साखर कारखान्यांना गाळप करताना अडचणी येत आहेत. पावसामुळे कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळपासाठी आवश्यक ऊस पुरवठा होत नाही. दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त उसाचे गाळप करणाऱ्या सोनीपत सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाला पावसाने ब्रेक लागला आहे. पावसामुळे शेतकरी ऊस घेऊन सोनीपत साखर कारखान्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसानंतर रविवारीसुद्धा हवामान स्वच्छ नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ऊस तोडणी करता आली नाही. त्यामुळे कारखान्यांमध्ये ‘नो केन’ स्थिती निर्माण झाली. कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिना होत आला आहे. गेल्या २४ तासांत सुमारे साडेचौदा हजार क्विंटल उसाचे गाळप कारखान्यामध्ये झाले असून त्यानंतर ऊस संपला आहे. कारखान्यामध्ये ६ लाख क्विंटलहून अधिक उसाचे गाळपाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ३२ लाख क्विंटल ऊस गाळपाचे करार शेतकऱ्यांशी करण्यात आले आहेत. गेल्या काही हंगामात कारखान्याने सरासरी ३० लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. कारखाना प्रशासनाने ३० डिसेंबरपर्यंत स्लिप खुल्या केल्या आहेत, म्हणजे या कालावधीत कोणताही शेतकरी ऊस आणू शकतो.