हिंगोली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२६–३१ कालावधीतील संचालक निवडणुकीसाठी प्रतिनिधी ठरविण्याच्या मुद्द्यावर वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ उडाला. वाद वाढत गेल्याने कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांनी अखेर सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी ठराव मंजूर करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र ९ एप्रिलला नोटीस देऊन अवघ्या तीन दिवसांत बैठक घेण्यात आल्याने नियमभंग झाल्याचा आरोप काही संचालकांनी केला. यावरून वातावरण तापले आणि काही संचालक आक्रमक झाले. त्यानंतर प्रतिनिधी निवडीचा मुद्दा मागे पडत कारखान्याच्या एकूण कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
भंगार विक्रीतील व्यवहार, कामगारांचे थकीत वेतन तसेच कारखाना इतरांना चालवण्यासाठी करण्यात आलेल्या करारावर एकमत नसल्याने वाद अधिकच चिघळला. संचालक आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद उघड झाल्याने बैठकीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
टोकाई कारखाना यापूर्वीही अशा वादग्रस्त बैठकींमुळे चर्चेत राहिला आहे. निर्णय प्रक्रियेत सातत्याने अडथळे येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. दरम्यान, संतप्त संचालकांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. प्रतिनिधी निवडीसाठी आता २२ एप्रिल रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.


















