होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे 18.6 अब्ज डॉलर अनुदान असूनही खरीप हंगामापूर्वी भारतास अन्नमहागाईचा धोका : FAO

नवी दिल्ली:’एफएओ’चे मुख्य अर्थतज्ज्ञ मॅक्सिमो टोरेरो यांनी ‘एएनआय’ला सांगितले की, आर्थिक वर्ष 2026-27 साठी 18.6 अब्ज अमेरिकी डॉलरचे खत अनुदान असतानाही भारतास अन्नमहागाईचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असून खरीप पेरणीपूर्वी खतांची उपलब्धता धोक्यात आली आहे. त्यांनी ईमेलद्वारे दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, हे संकट (खाडीतील संघर्ष आणि सरासरीपेक्षा कमी मान्सून) कायम राहिल्यास भारताच्या आयात खर्चात वाढ, देशांतर्गत खत उपलब्धतेत घट आणि गहू, तांदूळ व भाजीपाला यांच्या किमतींवर दबाव निर्माण होईल.

ते पुढे म्हणाले की, 2026-27 साठी सरकारचे 18.6 अब्ज डॉलरचे खत अनुदान काही प्रमाणात मदत करेल, मात्र राजकोषीय ताण वाढत आहे. अमेरिका-इराण तणाव आणि होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्याबाबत त्यांनी सांगितले की, भारत या बाबतीत कमकुवत स्थितीत आहे, कारण भारत सुमारे 35 टक्के खत खाडी देशांकडून आयात करतो आणि प्रति हेक्टर 120 किलोपेक्षा जास्त नायट्रोजन वापरतो. सरकारने गॅस वाटप ऐतिहासिक सरासरीच्या 70 टक्क्यांपर्यंत मर्यादित केल्यामुळे देशांतर्गत खत प्रकल्प सध्या फक्त 60 टक्के क्षमतेने चालत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

पंजाबमधील नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडचे प्रकल्प पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे त्यांनी सांगितले. भारतात खरीप पेरणीचा हंगाम मे महिन्यात सुरू होतो आणि 2026 मध्ये मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची 60 टक्के शक्यता आहे. खत व्यापारातील अडथळे 60 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास पिकांच्या उत्पादनावर आणि अन्नधान्याच्या किमतींवर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. खतांच्या किमती वाढल्यास त्याचा वापर कमी होतो, त्यामुळे उत्पादन घटते. यामुळे जगभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. जागतिक धान्य उत्पादकांच्या उत्पन्नात सुमारे 5 टक्क्यांनी घट होऊ शकते. पुरवठा कमी झाल्यास धान्य बाजार तंग होतात, किमती वाढतात आणि गहू, तांदूळ व सोयाबीनसारख्या पिकांवर परिणाम होतो, असेही ते म्हणाले.

मॅक्सिमो टोरेरो म्हणाले कि, इंधन दरवाढीमुळे सिंचन, वाहतूक, साठवण आणि प्रक्रिया खर्च वाढतील, त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा कमी होईल. ऊर्जा दरवाढीमुळे नैसर्गिक वायू महाग होतो, जो नायट्रोजन खतांचा मुख्य कच्चा माल आहे. जागतिक खत किमती आधीच 50-80 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी शेतकरी खतांचा वापर कमी करतात आणि उत्पादन घटते. याचा सर्वाधिक परिणाम तांदूळ, मका आणि गहू या नायट्रोजन-प्रधान पिकांवर होतो. मात्र हा संघर्ष काही महिन्यांत संपल्यास परिस्थिती सुधारू शकते. सामुद्रधुनी 60 दिवसांत खुली झाल्यास बाजार तीन-चार महिन्यांत स्थिर होतील. मात्र अडथळे 60 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास परिस्थिती गंभीर होईल. दीर्घकालीन संघर्ष झाल्यास 2030 पर्यंत पूर्ण सुधारणा होणार नाही.याशिवाय 2027 मध्ये अन्नधान्य किमती वाढून महागाई वाढेल, व्याजदर वाढतील आणि आर्थिक वाढ कमी होईल. ‘एफएओ’च्या अंदाजानुसार आर्थिक वाढीत सुमारे 1.7 टक्क्यांची घट होऊ शकते. होर्मुज सामुद्रधुनीतून जागतिक खत व्यापारातील 30 टक्के, समुद्री तेल वाहतुकीचा एक चतुर्थांश, नैसर्गिक वायूचा 20 टक्के आणि सल्फरचा 50 टक्के पुरवठा होतो, त्यामुळे या संघर्षाचा जागतिक अन्नसुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here