धाराशिव : पावसाअभावी ऊस सुकू लागला, उमरगा तालुक्यातील शेतकरी चिंतेत

धाराशिव : पावसाअभावी तालुक्यात पेरणीचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला गती दिली खरी; पण आतापर्यंत केवळ ५४ टक्केच पेरण्या शक्य झाल्या आहेत. उशिरा झालेल्या पेरण्यांनंतर पुन्हा पाऊस गायब झाल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक चिंतातूर आहेत. उमरगा तालुक्यात उन्हाळा आणि हिवाळ्यासारखे विषम वातावरण जाणवत आहे. जून व जुलै महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस न झाल्याने तालुक्यातील विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. याचा थेट फटका ऊस पिकाला बसत आहे. ऊस पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहे.

उमरगा तालुक्यात दोन मध्यम प्रकल्पांसह २८ साठवण तलाव आहेत. या जलस्रोतांच्या जिवावर अन् प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतात कूपनलिका, विहिरी खोदल्याने तब्बल १० हजार हेक्टरवर उसाची लागवड केली. मात्र, पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने उसाला पाणी देणे अशक्य झाले असून, फडातील ऊस डोळ्यांदेखत वाळू लागला आहे. सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात असल्याची स्थिती आहे. जून महिन्यात सरासरी ११० पैकी ९४ मिमी पाऊस झाला. तोही अधूनमधून झाला आहे. जुलै महिन्यातही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस पडलाच नाही तर पिके कशी जगवायची आणि पशुधनाचे काय करायचे याची चिंता लोकांना सतावू लागली आहे. मोठ्या अपेक्षेने लावलेला ऊस आता पाण्याचा साठा संपल्यामुळे शेतातच वाळू लागला आहे. आमची सर्व मेहनत आणि भांडवल वाया जात आहे, असे शेतकरी गोविंद पाटील यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here