नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे काही अडथळे निर्माण झाले असले तरी भारताकडे कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे. तसेच एलएनजी आणि एलपीजीचा पुरवठा अखंडित ठेवण्यात आला आहे. संयुक्त आंतरमंत्रालयीन बैठकीत बोलताना संयुक्त सचिव (मार्केटिंग व ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशाकडे सध्या कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून पुढील दोन महिन्यांसाठी इंधन पुरवठा सुरक्षित करण्यात आला आहे. रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने किंवा त्याहून अधिक क्षमतेने कार्यरत आहेत आणि देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जागतिक तणावाचा परिणाम अधोरेखित करताना शर्मा यांनी सांगितले की कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या आहेत. मात्र, परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने विविध पातळ्यांवर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सध्या आपण युद्धासारख्या परिस्थितीत आहोत आणि मध्य पूर्वेतील संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजी सर्वच प्रभावित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या आहेत. तरीही भारत सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. आजच्या घडीला आपल्याकडे पुरेसा साठा असून पुढील दोन महिन्यांचा पुरवठा सुरक्षित आहे. एलपीजी आणि पीएनजी बाबतही परिस्थिती समाधानकारक आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, भारत एलपीजी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, ज्यापैकी सुमारे 90% आयात होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होते. त्यामुळे सरकारने घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले. व्यावसायिक एलपीजी पुरवठा तात्पुरता कमी करण्यात आला होता, जो टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात आला—प्रथम 20%, नंतर 50% आणि आता 70% पर्यंत वाढविण्यात आला आहे. सरकारच्या या उपाययोजनांमुळे 14 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 30,000 टन व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे. यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, स्थलांतरित कामगार आणि स्टील, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, रसायने आणि प्लास्टिक यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
याशिवाय, स्थलांतरित कामगारांसाठी सुमारे 30,000 छोटे (5 किलो) एलपीजी सिलिंडरही वितरित करण्यात आले आहेत.सरकारने म्हटले आहे की या उपाययोजनांमुळे पुरवठा साखळी स्थिर राहण्यास मदत झाली असून देशभर आवश्यक इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. (एएनआय)


















