जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२६-२७ च्या आगामी हंगामासाठी पीक कर्जदरांचे नवीन धोरण जाहीर केले आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केलेल्या दरांना बँकेच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, दि. १ एप्रिलपासून हे दर लागू झाल्याचे दैनिक ‘लोकमत’ने म्हटले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणारी मुख्य संस्था जिल्हा बँक आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेचे संचालकांना शेतकऱ्यांनी निवडून दिलेले असते. शेतीतील वास्तव खर्च, मजुरी आणि खतांच्या वाढत्या किमती याची खरी जाण संचालकांना असते. त्यामुळे तांत्रिक समितीऐवजी जिल्हा बँकेनेच हे धोरण स्वतंत्रपणे ठरविल्यास शेतकऱ्यांना अधिक आधार मिळेल, अशी मागणी जोर धरत आहे.
कोणत्या पिकाला किती कर्ज द्यावे, याचे धोरण सध्या जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्या स्तरावर ठरविले जाते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून ठरविले जाणारे हे कर्जदर अल्प असतात, प्रत्यक्षात शेतीला लागणारा खर्च आणि मिळणारे कर्ज यात मोठी तफावत असते. जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी जो शेतीचा खर्च ठरवतात, तो वास्तवापेक्षा खूप कमी असतो. जिल्हा बँकेचे संचालक मातीतले लोक आहेत, त्यामुळे कर्ज मर्यादा ठरविण्याचा पूर्णअधिकार बँकेलाच हवा, असे शेतकऱ्यांचे मत आहे.


















