जालना: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागात जालना जिल्ह्यातील कामगार स्थलांतरित झाले होते. गळीत हंगामाची समाप्ती झाल्याने हे कामगार आता परतू लागले आहेत. तसेच अंबड आणि घनसावंगी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील समर्थ, सागर, समृद्धी, ब्लू सफायर गूळ पावडर या कारखान्यांसह ग्रामीण भागात गूळ युनिटवर कार्यरत असलेले मजुरही गाळप हंगाम संपल्याने माघारी वळले आहेत. कारखान्यांवरील कोयते थांबल्याने मजुरांनी आपली पालं गुंडाळली आहेत. महामार्गांवर सध्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि ट्रकमधून आपल्या संसारासह घरी परतणाऱ्या कामगारांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.
ऊस तोडणीच्या कामाच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून घरापासून दूर असलेल्या ऊसतोड कामगारांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हे कामगार साधारणपणे सहा ते सात महिने आपल्या मूळ गावाहून दूर राहतात. निसर्गाचा लहरीपणा आणि उसाचे कमी उत्पादन याचा थेट फटका त्यांच्या मजुरीवर होतो. त्यांचे काम शारीरिकदृष्ट्या अत्यंत थकवणारे असते. साखर उद्योगाचा कणा असलेला हा घटक आजही उपेक्षित आहे. ऊसतोड कामगार मंडळ स्थापन झालेले आहे. त्याचा फायदा तळागाळातील ऊसतोड मजुरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.


















