जालना : साखर दरवाढीचा चहालाही फटका, एका कप चहासाठी आता मोजावे लागत आहेत १५ रुपये

जालना : गेल्या काही दिवसांपासून महागाईचा आलेख वाढत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या भेसळविरोधी कारवाईचे कारण देत दूध डेअरीमालकांनी दरवाढ केली. त्यापाठोपाठ आता साखरेचे वाढलेले दर सामन्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत आहेत. ४० रुपये किलो असणारी साखर महिनाभरात ८० रुपये किलो झाली आहे. दूध आणि साखरेचे दर वाढल्याने चहा विक्रेत्यांनी एक चहाचा कप दहा रुपयांवरून पंधरा रुपये केला आहे. शहरातील चहाच्या टपऱ्या, हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये चहाच्या दरवाढीचे फलक लावण्यात आले आहेत.

वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी चहाच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे काही व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. साखर आणि दुधाच्या दरात झालेल्या वाढीच्या परिणामामुळे चहाचे दर वाढले आहेत. १० रुपयांचा चहाचा कप १५ रुपयांना झाला आहे. यााबाबत एका हॉटेल मालकाने सांगितले की, साखर ८० रुपये किलो झाली आहे. दूधदेखील ६० रुपयांवरून ८० रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे चहाचे दर वाढवावे लागले. संपूर्ण शहरात हॉटेल चालकांनी दहा रुपयांचा चहा आता पंधरा रुपयांना केला आहे. दुसरीकडे मिठाईचे दर सध्या स्थिर आहेत. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर नियंत्रणात आले नाही, तर सणासुदीच्या काळात मिठाईचे दर ही वाढण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here