जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन संघटनेचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि पोलिस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत ऊसदरावर तोडगा निघाला. उसाला प्रतिटन ३,२०० रुपये पहिली उचल आणि त्यावर १०० व १०० रुपये असे एकूण ३,४०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास ७०:३० या सूत्रानुसार शेतकऱ्यांचा ७० टक्के हिस्सा राहील आणि त्यानुसार उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे ठरले. या निर्णयानंतर २७ नोव्हेंबरचे ठिय्या आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांना दिले.
या बैठकीला कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष उत्तम पवार, कार्यकारी संचालक एस.व्ही. पाटील, व्यवस्थापकीय संचालक बी.टी. पावसे, संचालक मनोज मरकड, तर पोलिस प्रशासनाकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, प्रगतिशील शेतकरी दिलीप हातोटे, तालुका सचिव राहुल गडेकर, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, अंबड तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, उपाध्यक्ष मुकेश डूचे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, कार्यकारिणी सदस्य भारत उंडे, राधाकृष्ण मैंद, श्रीनिवास कुरणकर, युवा नेते बापूसाहेब अनुसे आदींनी प्रशासनाशी चर्चा केली. त्यामध्ये पहिली उचल निश्चित करून नंतरच्या ऊस दरासाठी फॉर्म्युला मांडण्यात आला. त्यानंतर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २७ नोव्हेंबरला होणारे ठिय्या आंदोलन रद्द करण्यात आले.


















