पुणे : ऊसदराच्या स्पर्धेत दौंड तालुक्यात सर्वाधिक पहिली उचल देत ओंकार ग्रुपने आघाडी घेतली आहे. यवत येथील ओंकार रिन्यूएबल शुगर्स अँड बायोफ्युएल्स प्रा. लि. (युनिट क्रमांक १२) ने चालू गाळप हंगाम २०२६-२७ मध्ये (दि. १५) नोव्हेंबरपर्यंत गाळपासाठी आलेल्या उसापोटी प्रतिटन ३,६०० रुपये याप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कारखान्याने केवळ ऊसदर जाहीर न करता वेळेत ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ओंकार ग्रुपने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
यासंदर्भात ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ओंकार ग्रुप ऊसदराच्या बाबतीत कधीही मागे राहिलेला नाही आणि भविष्यातही राहणार नाही. शेतकऱ्यांचा कष्टाला योग्य मोबदला देणे आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ३,६०० रुपयांची पहिली उचल देत शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला हे आमचे प्राधान्य आहे. तर कारखान्याचे जनरल मॅनेजर राजेश थोरात यांनी सांगितले की, अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा विचार करून ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. आगामी गाळप हंगामात येणाऱ्या उसाला ३ हजार ८०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


















