जालना : ऊसासाठी एआयचा वापर करा; समर्थ कारखान्याच्या परिसंवादात तज्ज्ञांचा सल्ला

जालना : ऊस पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच सुधारित बेणे, ठिबक सिंचन आणि माती परीक्षणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट क्रमांक १ (अंकुशनगर) आणि युनिट क्रमांक २ (सागर), तीर्थपुरी यांच्या वतीने कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त ‘रोग-कीड नियंत्रण व ऊस पीक परिसंवाद’ आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या आधुनिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

तीर्थपुरी येथील कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या या परिसंवादास माजी मंत्री तथा समर्थ उद्योग समूहाचे मार्गदर्शक राजेश टोपे, कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), पुणे येथील पीक संरक्षण व संगोपन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी ऊस पिकावरील विविध बुरशीजन्य आजार आणि किडींची ओळख, त्यांचा प्रादुर्भाव तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. औषधांची फवारणी करताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel

कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे एआय प्रकल्प प्रमुख तुषार जाधव यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस लागवड व पीक संगोपन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि व्हीएसआय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस पिकासाठी विविध शेतांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ‘व्हीएसआय’चे शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, शास्त्रज्ञ सचिन पाटील, मॅप मायक्रॉप कंपनीचे परिमल गिरी आणि फसल कंपनीचे नितीन शिंदे यांनीही ऊस लागवड, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी समर्थ कारखान्याच्या माध्यमातून अत्यल्प दरात ड्रोनद्वारे औषध फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ऊस पिकावरील रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासोबतच फवारणीचा खर्च आणि वेळ कमी करण्यास मदत होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here