बेळगाव : सरकारचे साखर दरावर नियंत्रण आहे. दर वाढल्याची बातमी येत असतानाच लगेच दर उतरल्याने शेतकऱ्यांना व कारखान्यांना मोठा फटका बसत आहे. साखरेचा शिल्लक साठा तपासण्याची विशेषण यंत्रणा ठेवली. शेतकऱ्यांच्या पिकाला दर देण्यास कारखाने तयार आहेत, पण खर्चाचा साखरेच्या दरामुळे ताळमेळ बसत नाही. कारखान्यांसमोर आंदोलन करणारे अनेक नेते राजकीय पदांवर आहेत. त्यांनी सरकारकडे जाऊन आक्रोश करायला हवा. साखरेचा दर वाढवण्यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांचे हित पाहावे अशी अपेक्षा चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक, डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. नणंदी येथे कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे होते.
यावेळी डॉ. कोरे यांनी साखर उद्योग शेतकऱ्यांशी थेट निगडित आहे. या उद्योगावर सरकारचे नियंत्रण आहे. साखर दरातील चढ-उतारामुळे शेतकरी आणि कारखानेही अडचणीत आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पुढे यावे, असे मत व्यक्त केले. ऊस पिकासाठी एआय तंत्रज्ञान गरजेचे आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती बारामतीत केली आहे. या भागातील शेतकऱ्यांना कारखान्याकडून तेथील दौरा करून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक अमित कोरे यांनी कारखान्याने गेल्यावर्षी ९८ दिवस गाळप करून १० लाखांवर टन ऊस गाळप केले आहे. इथेनॉल, उपउत्पादन वाढविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत बिले दिली जात असल्याचे सांगितले.
संचालक महांतेश कवटगीमठ यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर केला. व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. बी. खंडगावे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. डॉ. प्रभाकर कोरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, अजित देसाई, भरतेश बनवणे, नंदकुमार नाशिपुडी, संदीप पाटील, महावीर मिरजी, अण्णासाहेब इंगळे, भीमगौडा पाटील यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. परसगौडा पाटील यांनी स्वागत केले. शिवप्रसाद कोरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक चेतन पाटील यांनी आभार मानले.


















