कर्नाटक : शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे ऊस दरात प्रतिटन ३५० रुपयांची वाढ, लाभांश वाटपाचे सूत्रही ठरले

बेळगाव : जवळपास एक महिनाभर चाललेल्या ऊस दर आंदोलनानंतर तोडगा निश्चित झाला आहे. साखर कारखानदारांनी प्रतिटन ३५० रुपयांची वाढ देण्याचे मान्य केले.सत्याचबरोबर लाभांश वाटपाचे सूत्रही स्वीकारण्यात आले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटक रयत संघ हरित सेनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी आणि कार्याध्यक्ष शशिकांत पडसलगी यांच्या नेतृत्वाखाली गुर्लापूर येथून सुरू झालेल्या आंदोलनाच्या ठिणगीने वातावरण तापवले. अखेर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

यावर्षी शेतकऱी संघटनांनी उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मागितला होता. त्यासह साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करावी आणि इथेनॉल खरेदी दरात ७० रुपयांची वाढ करावी अशा प्रमुख मागण्या केल्या. गेल्या महिनाभराहून अधिक काळ शेतकऱ्यांनी लढा दिला. बळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. नंतर दिल्लीतील बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत हुबळीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सुवर्णसौध येथे बैठकही घेतली. ८१ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहूनही तोडगा निघाला नव्हता. नंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सलग दोन दिवस बैठका घेत तोडगा काढला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या वर्षी कारखानदारांनी २५० रुपये आणि सरकारने ५० रुपये अशी एकूण ३०० रुपयांची वाढ मिळाली होती. यंदा प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here