बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने इथेनॉल खरेदीसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय देत तेल विपणन कंपन्यांना (OMCs) दीर्घकालीन ऑफ-टेक करारांअंतर्गत (LTOA) इथेनॉल खरेदी वाढविण्याच्या मागणीचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यमान सरकारी धोरणांमुळे निर्माण झालेल्या करारात्मक बांधिलकी आणि उत्पादकांच्या वैध अपेक्षांकडे कोणतेही ठोस कारण न देता दुर्लक्ष करता येणार नाही.
या प्रकरणात एका इथेनॉल उत्पादकाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तेल विपणन कंपन्यांनी घालून दिलेल्या मर्यादित निविदा अटींना आव्हान देणारी याचिका मंजूर केली. न्यायालयाने नमूद केले की, संबंधित उत्पादकाला करारातील अटी आणि गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण खरेदीच्या पद्धतीमुळे भविष्यातही खरेदी सुरू राहील, अशी “वैध अपेक्षा” (Legitimate Expectation) होती.
ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन (AIDA) चे अध्यक्ष विजेंद्र सिंह यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, न्यायालयाने इथेनॉल वाटपाची प्रक्रिया तेल विपणन कंपन्यांकडेच ठेवली असली तरी त्या अधिकाराच्या वापरावर काही कायदेशीर मर्यादा घातल्या आहेत. ते म्हणाले, “या निर्णयामुळे भविष्यातील इथेनॉल वाटपाशी संबंधित वादांमध्ये डिस्टिलरी इथेनॉल उत्पादकांची (DEP) भूमिका अधिक मजबूत झाली आहे. मात्र, करारातील कलम 6.8 अंतर्गत हमखास खरेदीची हमी मिळालेली नाही.”
सिंह यांच्या मते, न्यायालयाने इथेनॉल उत्पादकांचे विशेष स्थान आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे महत्त्व मान्य केले आहे. त्याचबरोबर खरेदीचे निर्णय हे व्यापक सार्वजनिक हित आणि राष्ट्रीय इथेनॉल धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहिले पाहिजेत, हेही अधोरेखित केले आहे.तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय देशातील इथेनॉल उत्पादकांसाठी महत्त्वाचा संदेश आहे. सरकारी धोरणांवर आधारित करारात्मक जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण झालेल्या वैध अपेक्षांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील इथेनॉल खरेदी प्रक्रिया आणि दीर्घकालीन ऑफ-टेक करारांवर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.


















