बेळगाव : कर्नाटक सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल केला आहे. त्यानुसार, इब्राहिम मैगूर यांची कर्नाटक हातमाग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे बेळगाव येथील साखर व ऊस विकास संचालनालयाच्या विशेष अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.राज्य सरकारच्या कामगार व प्रशासकीय सुधारणा विभागाने १९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती.
अधिसूचनेनुसार, आयएएस अधिकारी लता आर. (२०१२ तुकडी) यांची कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या आयुक्तपदी करण्यात आलेली नियुक्ती मागे घेण्यात आली आहे. त्यांना पुढील नियुक्तीसाठी कामगार व प्रशासकीय सुधारणा विभागात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, इब्राहिम मैगूर (२०१७ तुकडी) हे यापूर्वी बंगळूर येथे फलोत्पादन संचालक आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची तत्काळ प्रभावाने हुबळी येथील कर्नाटक हातमाग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील.
याशिवाय, बेळगाव येथील साखर व ऊस विकास संचालनालयाच्या नव्याने तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या विशेष अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, गोविंद रेड्डी (२०१३ तुकडी) हे ऊस विकास आयुक्त आणि साखर संचालक, बेळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सांभाळणार आहेत.


















