कर्नाटक : साखरेची एमएसपी वाढवल्यास ३,५०० रुपये ऊस दर देण्याची मंत्री सतीश जारकीहोळी यांची ग्वाही

बेळगाव : गेल्या आठवड्यात ऊसदरासंदर्भात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तसेच, बेळगाव दौऱ्यावेळी या विषयावर चर्चा झाली. मात्र, शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात दराबाबत अद्याप एकमत झालेले नाही. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारने एमएसपीमध्ये वाढ करावी, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. राज्योत्सवानिमित्त जिल्हा क्रीडांगणावर रविवारी (ता.१) ध्वजवंदन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढविल्यास साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्यास तयार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने प्रतिटन ३,५०० रुपये देण्यास तयार आहेत. मात्र, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी दर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढणे आवश्यक आहे. साखरेचा एमएसपी निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने त्यात वाढ केल्यास कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कारखान्यांंकडील ऊस वजनातील काटामारीच्या तक्रारींबाबत त्यांनी वजनात फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रार करावी. त्यानुसार चौकशीचे निर्देश दिले जातील, असे सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त प्रकाश निकम उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here