कर्नाटक : बेळगावमध्ये मार्कंडेय कारखाना सुरू करण्याच्या हालचाली, शेतकऱ्यांचे ऊस दराकडे लक्ष

बेळगाव : यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम किती काळ चालणार, याबाबतही अनिश्चितता आहे. हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असल्याने उपलब्ध वेळेत गाळप पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत कोणताही विलंब न लावता काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना सुरु करावा आणि कारखान्याने ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मार्कंडेय कारखाना बंद आहे. मात्र अनेक ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याशी जोडलेले आहेत. इतर कारखान्यांच्या तुलनेत समाधानकारक दर जाहीर केल्यास शेतकरी मार्कंडेयला ऊसपुरवठा करण्यास प्राधान्य देऊ शकतात असे सभासदांचे म्हणणे आहे.

सध्या मार्कंडेय साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारखान्याच्या अंतर्गत कामांना सुरुवात झाली असून, ऊस तोडणीसाठी टोळ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात असली तरी प्रत्यक्ष गळीत हंगाम कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना किती दर मिळणार, याबाबत व्यवस्थापनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी टोळ्या शेतवडीत दाखल झाल्या असून, अनेक ठिकाणी ऊसतोडणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊस कोणत्या कारखान्याला पाठवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांनी आपापले ऊसदर जाहीर केले असताना मार्कंडेय कारखान्यानेही तातडीने दर जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here