बेळगाव : कर्नाटक हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे साखर उत्पादक राज्य आहे. राज्यात सध्या ८१ साखर कारखाने कार्यरत असून त्यापैकी सर्वाधिक २८ कारखाने बेळगाव जिल्ह्यात आहेत. एका सरासरी हंगामात कर्नाटकात साधारण ४५ लाख टन साखरेचे उत्पादन होते. एकट्या बेळगाव जिल्ह्यातून राज्याच्या एकूण उत्पादनापैकी मोठा वाटा उचलला जातो. मात्र, विक्री किंमत न वाढल्याने कारखान्यांकडे खेळते भांडवल कमी आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या बिलावर होताना दिसत आहे. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) गेल्या काही वर्षांपासून एकाच जागी स्थिरावली आहे. यामुळे उत्तर कर्नाटक आणि विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने ‘उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी’ अशा संकटात असून याचे परिणाम ऊस उत्पादकांना भोगावे लागत आहेत.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये साखरेची एमएसपी ३१०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली होती. २०२६ मध्येही हा दर बदललेला नाही. तर २०१७-१८ मध्ये उसाची एफआरपी साधारण २५५० रुपये प्रति टन होती. ती आता ३४०० रुपयांपर्यंत गेली आहे. साखर उत्पादनासाठी लागणारी रसायने, मजुरी, वाहतूक, यंत्रसामग्रीच्या देखभालीचा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी वाढला आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने बँकांकडून मिळणारे कर्ज आणि उसाची देणी यांचा ताळमेळ बसवताना कारखानदारांना कसरत करावी लागत आहे. बदलत्या सरकारी धोरणांचाही मोठा फटका या क्षेत्राला बसत आहे. जर केंद्राने साखरेची एमएसपी किमान ३८०० ते ४००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवली नाही, तर आगामी हंगामातही उसाची बिले वेळेवर मिळणे कठीण होणार आहे. याबाबत हर्षा शुगर्सच्या संचालक मृणाल हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या सात वर्षांत साखरेचे दर स्थिर राहिल्याने अनेक कारखाने आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सध्या साखरेची किमान विक्री किंमत वाढवणे हाच कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी वेळेवर देण्यासाठी एकमेव पर्याय उरला आहे.


















