बेळगाव : ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनाची कोंडी फोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत कारखानदारांनी मागील हंगामापेक्षा प्रतिटन ३५० रुपये अधिक देण्याचे मान्य केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांनी बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री १०.३०. पत्रकार परिषद घेऊन वाढीव लाभांश सूत्राची माहिती दिली. शेतकरी बांधवांनी आंदोलन मागे घेत कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले. पोलिस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन उपस्थित होते.
गळीत हंगामासाठी निश्चित केलेल्या दर सूत्रानुसार पहिली उचल म्हणून प्रतिटन ३५०० रुपये दिले जातील. हंगाम संपल्यानंतर दुसरी उचल म्हणून आणखी १०० रुपये प्रतिटन दिले जातील. त्यामुळे सुरुवातीला एकूण ३६०० रुपये मिळणार आहेत. पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक असल्यास अंतिम ऊस बिलात वाढ देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. साखरेच्या विक्री दरानुसार अतिरिक्त उत्पन्नातील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर २५ टक्के हिस्सा कारखान्यांना मिळणार आहे. साखरेचा सरासरी दर प्रतिकिलो ४८ रुपये झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये अतिरिक्त मिळतील. साखरेचा दर ५० रुपये झाल्यास २५० रुपये, तर ५५ रुपये झाल्यास ७५० रुपये अतिरिक्त देय होतील अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.


















