नवी दिल्ली: संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने स्पष्ट केले की, उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी खरीप हंगामातील पेरणी सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तरात सांगितले की, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), आयसीएआर-सीरीडा (CRIDA), केंद्रीय जल आयोग (CWC), केंद्रीय भूजल मंडळ (CGWB), महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र (MNCFC), अन्न व सार्वजनिक वितरण विभाग (DFPD), खत विभाग (DoF) आणि राज्य सरकारांशी समन्वय साधून मान्सूनची बदलती स्थिती आणि एल निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम यावर सतत नजर ठेवत आहे.
खरीप पेरणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ 5% घट
सरकारने सांगितले की, खरीप 2026-27 हंगामातील पेरणी अद्याप सुरू आहे आणि प्रमुख खरीप पिकांचे पहिले आगाऊ उत्पादन अंदाज अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. 13 जुलै 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाची पेरणी केवळ 5 टक्क्यांनी कमी आहे. कृषी मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जिल्हास्तरावर पीक व वाण निवड, लवकर तयार होणाऱ्या अल्पकालीन वाणांचे बियाणे साठवण, राष्ट्रीय बियाणे राखीव (NSR) योजनेअंतर्गत बियाण्यांचा साठा, मान्सूनपूर्व आकस्मिक बियाणे राखीव सक्रिय करणे तसेच बियाण्यांची गुणवत्ता व उपलब्धता यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
342 जिल्ह्यांसाठी आकस्मिक कृषी आराखडे अद्ययावत
आयसीएआर-सीरीडा आणि राज्य सरकारांनी संयुक्तपणे 342 जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय कृषी आकस्मिक आराखडे अद्ययावत केले आहेत. या आराखड्यांमध्ये मान्सून उशिरा सुरू झाल्यास, हंगामाच्या मध्यावर दुष्काळ पडल्यास आणि हंगामाच्या शेवटी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती पीक धोरणे अवलंबावीत, याचा समावेश आहे. याशिवाय, आयसीएआरने कृषी विज्ञान केंद्रांसाठी (KVKs) मानक कार्यपद्धती (SOPs) तयार केली आहे. त्यामध्ये गरजेनुसार आकस्मिक आराखडे तयार करणे, कृषी विभाग व इतर यंत्रणांशी समन्वय, रिअल-टाइम कृषी सल्ला, क्षमता विकास, जनजागृती आणि त्वरित अभिप्राय यांचा समावेश आहे.
आपत्ती निवारणाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची
सरकारने स्पष्ट केले की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरणानुसार (NPDM) अधिसूचित नैसर्गिक आपत्तींच्या परिस्थितीत राज्य सरकारांवर मदतकार्याची प्राथमिक जबाबदारी असते.राज्य सरकारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधील उपलब्ध निधीतून मंजूर निकषांनुसार मदतकार्य करतात. आपत्ती गंभीर स्वरूपाची असल्यास, ठरलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) अतिरिक्त आर्थिक सहाय्याचा विचार केला जातो. यासाठी अंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक (IMCT) प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देते आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी निवेदन सादर केले जाते.सरकारने हेही स्पष्ट केले की एसडीआरएफ आणि एनडीआरएफ अंतर्गत दिली जाणारी मदत ही दिलासा स्वरूपातील असते; ती नुकसानभरपाई म्हणून दिली जात नाही.


















