कोल्हापूर : आंदोलन अंकुशकडून उसाला प्रति टन ५००० रुपये दरासाठी कवठेसार येथे शेतकरी जागर सभा

कोल्हापूर : आपल्याकडे दहा-अकरा वर्षांपूर्वी २०१५ मध्ये साखर प्रती क्विंटल २३२१ रुपये दराने विकली जात असताना उसाला प्रति टन २५३३ रुपये दर मिळाला. गेल्यावर्षी साखरेचा दर प्रती क्विंटल ४१०० रुपये असताना उसाला प्रति टन ३५०० रुपये मिळाले. पुढील वर्षी साखरेचा दर पाच हजार रुपये राहण्याची शक्यता असल्याने उसालाही पाच हजार रुपये दर मिळावा, अशी संघटनेची भूमिका आहे, असे प्रतिपादन आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. कवठेसार (ता. शिरोळ) येथे झालेल्या शेतकरी जागर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुरंदर तेरदाळे होते. आजवर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची संधी आहे. कारखान्यांनी उसाला पाच हजार रुपये दर जाहीर करेपर्यंत ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन चुडमुंगे यांनी केले.

चुडमुंगे म्हणाले की, २०१६ मध्ये भागातील साखर कारखान्यांनी उसाला ३११५ रुपये दर दिला. तर गेल्यावर्षी ३५०० रुपये दर मिळाला. दहा वर्षांत उसाचा दर केवळ ४०० रुपयांनी वाढला. उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला. त्यामुळे ऊसशेती तोट्यात जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गत हंगामातील आंदोलनानंतर आपल्या भागातील साखर कारखान्यांनी तोडग्याप्रमाणे पैसे दिले. पण, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीच अद्याप शंभर रुपये दिले नाहीत. त्यांच्या कारखान्याकडूनही उर्वरित पैसे तातडीने दिले जावेत, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here